उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- साकोली तालुक्यातील बांपेवाडा गावाहून भंडाऱ्यात येऊन येथील कारधा पुलावरून वैनगंगेत आत्महत्या करणाऱ्या निखिल अशोक चिरवतकर या २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह अखेर २१ तासांनंतर काल,सोमवारी दुपारी वैनगंगेच्या सापडमध्ये सापडला.ज्या कारधा पुलावरून त्याने नदीत उडी घेतली होती; त्या ठिकाणापासून जवळपास एक किलोमीटर पुढे एका डोहात त्याचा मृतदेह तळाशी बुडालेल्या स्थितीत होता.
आत्महत्येची ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.घटनेची माहिती मिळताच परिवारातील तसेच पोलिस प्रशासनातील लोक घटनास्थळी दाखल झाले.रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत निखिलचा मृतदेह गोताखोरांच्या मदतीने शोधण्यात आला होता परंतु संध्याकाळ झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास पुन्हा शोध कार्य सुरू झाले असता सकाळी ११ वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीच्या कारधा पात्रात निखिलचा मृतदेह आढळला.
गोताखोराच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.त्यानंतर मृतदेह परिवारातील लोकांना सुपूर्त करण्यात आला.सोमवारी सायंकाळच्या सुमारास बाम्पेवाड येथील स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्यामागे आई-वडील,मोठा भाऊ,एक बहीण असून, मोठा आप्तपरिवार आहे.घरातील तरुण मुलगा असा एकाकी सोडून गेल्याने चिरवतकर कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

