उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- सात वर्षांपूर्वी शेतात बांधलेली विहीर आणि दोन वर्षांपूर्वी खोदलेली बोअरवेल ७-१२ उताऱ्यावर चढविण्यासाठी शेतकऱ्याकडून ७०० रुपयांची लाच स्वीकारणे भंडारा तालुक्यातील नेरी येथील तलाठ्याला चांगलेच महागात पडले आहे.शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिल्याने लाचेची रक्कम स्वीकारताना तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.अमोल पोरेड्डीवार वय ४४ वर्षे असे या तलाठ्याचे नाव आहे.
भंडारा तालुक्यातील नेरी गावात अमोल पोरेड्डीवार तलाठी म्हणून कार्यरत आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,५ जुलै रोजी गावातीलच एका ६७ वर्षीय तक्रारदार शेतकऱ्याने त्यांच्या शेतात दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या बोअरवेलची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी नेरी येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता.८ जुलै रोजी त्यांनी कार्यालयात जाऊन तलाठी अमोल पोरेड्डीवार याच्याकडे अर्जावर केलेल्या कार्यवाहीबाबत विचारणा केली असता,तलाठ्याने त्यांच्याकडे ७०० रुपयांची मागणी केली.शेतकऱ्याने भंडारातील लाचलुचपत कार्यालय गाठून तक्रार नोंदवली.त्याआधारे सापळा रचून काल,९ जुलै ला शेतकऱ्याकडून ७०० रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी अमोल पोरेड्डीवारला रंगेहात पकडले.
कारवाईदरम्यान,आरोपीकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, वरठी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे पोलिस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार,पोलिस निरीक्षक अमित डहारे आदींसह पथकाने ही कारवाई केली.

