उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- तालुक्यातील सावंगी वैनगंगा नदी रेती घाटावर अवैध रेती तस्करीवर काही काळ आळा घातला जावा; यासाठी वैनगंगा नदी घाटात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मधोमध भला मोठा खड्डा जेसीबीच्या सहाय्याने मारण्यात आला होता.मात्र रेती तस्करांनी मारलेला खड्डा बुजवून रेती तस्करीचा अड्डा चालविला असल्याने परत पुन्हा काल २१ मार्च २०२३ रोजी देसाईगंज महसूल विभागाने रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी खड्डा मारला आहे.
रेती चोरींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.अशातच महसूल विभागाकडून रेती तस्करीवर कितीही आळा घातला गेला तरी काही मुजोर रेती चोरटे व काही तथाकथित जणांकडून मिलीभगत केली जात असल्याने रेती तस्करी निर्ढावलेली दिसून येत आहे.अवैध रेती चोरीमध्ये पाणी पडल्यासारखा चटकन आणि पटकन पैसा जमा होत असल्याने रेती चोरीसाठी भाड्याने ट्रॅक्टरे व इतर साहित्यांचा वापर केला जात असल्याची खमंग चर्चा तालुक्यात सुरू आहे.
नवलाची बाब म्हणजे,सावंगी वैनगंगा नदी रेती घाटातील खड्डा बुजविण्यास रेती चोरट्यांनी काही अंतरावर असलेल्या महसूल विभागाच्याच गौण खनिजाचे वापर केल्याचे दिसून येते.म्हणजे ‘तुमचा खड्डा आणि आमचा अड्डा’ असे चोरट्यांकडून केल्या जात आहे.सदरची बाब सांध्य दैनिक ‘विदर्भ की दहाड़’ च्या प्रतिनिधी टीमने प्रत्यक्ष पाहनी करुन देसाईगंज महसूल विभागाच्या लक्षात आणून दिली असता लगेच काल २१ मार्च २०२३ रोजी दुपारच्या सुमारास देसाईगंज महसूल विभागाचे नायब तहसीलदार नैताम,मंडळ अधिकारी फुलकवर,तलाठी वनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन जेसीबीच्या साहाय्याने मुख्य रस्त्यावर भला मोठा खड्डा खोदण्यात आला आहे.