उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(कोंढाळा) :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा ग्रामपंचायत येथील ‘जल जीवन मिशन’ योजनेचे करोडो रुपयांचे काम ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असे केले जात आहे.अशातच सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबाबत गावातील नागरिकांनी जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतरांना तक्रार दाखल केली आहे.
गावातील नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,कोंढाळा ग्रामपंचायत येथील ‘जल जीवन मिशन’ योजनेचे काम गेली एक वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे.सुरुवातीला जलकुंभ बांधकाम,विहीर बांधकाम,पाईप लाईन जोडणी,घरगुती नळ जोडणी व इतर कामे पूर्ण करून ‘जल जीवन मिशन’ योजनेचे काम पूर्णत्वास आणले जाणार आहे.मात्र हल्ली सुरू असलेल्या पाईप लाईन जोडणी व घरगुती नळ जोडणीचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे.आम्ही गावातील नागरिक गावामध्ये सुरू असलेल्या पाईप लाईन जोडणी व घरगुती नळ जोडणीच्या कामावर प्रत्यक्ष पाहणी केली असता; पाईप लाईन वरती दगड व मुरूमाळी दगड टाकून पाईप बुजविले जात असल्याने एखादे वेळेस रहदारीच्या रस्त्यावरून जड वाहन गेल्यास पाईप लाईन फुटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.अशातच पाईप लाईन फुटल्यास खोदकाम करावयास गेल्यास पाईप कुठ पर्यंत आहे; हे कळणारच नाही.कारण की,पाईपच्या खाली व पाईपच्या वर रेतीच टाकली जात नाही.ग्रामपंचायत पदाधिकारी,कंत्राटदार व अभियंता उडवा-उडविची उत्तरे देऊन हात झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. अंदाजपत्रकात तरतूद नाही; असे सर्वांकडून सांगितले जात आहे.मात्र अंदाजपत्रकात तरतूद करणे आवश्यक असतांनाही जाणून-बुजून सदर काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे.तसेच पाईप लाईनचे पाईप व घरगुती नळ जोडणीचे पाईप ही निकृष्ट दर्जाचे टाकले जात आहे.सदर सुरू असलेल्या कामावर कुणीही लक्ष घालीत नसल्याने ‘चलती का नाम गाडी’ असे केले जात आहे.ना कोणती समिती लक्ष घालीत,ना कोणते ग्रामपंचायत पदाधिकारी लक्ष घालीत; त्याचप्रमाणे घरगुती नळ जोडणीच्या कामात दुसऱ्या व्यक्तीचे नाव समोर करून एक ग्रामपंचायत पदाधिकारी काम करीत असल्याची चर्चा गावामध्ये सुरू असल्याने अशांवर कारवाई होणे आवश्यक आहे.अशातच ज्या ठिकाणी पाईप लाईन व घरगुती नळ जोडणी करण्याची आवश्यकता नसतांनाही मागील काही महिन्यांपूर्वी तसेच काही वर्षांपूर्वी बांधकाम केलेले सिमेंट-काँक्रिटचे रस्ते पाईप लाईनसाठी खोदकाम करण्यात आले आहे.तसेच अशी रस्ते पूर्णपणे खोलगट होऊन शासनाच्या लाखो रुपयांवर पाणी फेरले गेले असल्याने कोंढाळा ग्रामपंचायत येथील ‘जल जीवन मिशन’ योजनेच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी; चौकशी समिती नेमतांना आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी; अशी मागणी गावातील सुजाण नागरिक नामदेव वसाके,विनोद राऊत,महेश दुपारे,आनंदराव दुपारे ,वासुदेव बुराडे,विकास मोहुर्ले, गणेश वसाके,अभिषेक बुराडे,सारंग राजगडे,भूषण राऊत,कार्तिक ठाकरे,महादेव ठाकरे,आशिष गावतुरे मंगेश वसाके,पवन खोब्रागडे व सचिन मोहुर्ले यांनी केली आहे.