उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- मागील वर्षी ऑगष्ट, सप्टेंबर महिन्यात कृत्रिमरित्या वैनगंगा नदीला आलेल्या पुराने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत धान पिकाची नासाडी झाली.त्यानंतर पंचनामेही झाले; याद्याही तयार झाल्या; परंतु अटी व शर्तीच्या कचाट्यात नऊ महिन्यांचा काळ लोटला असला तरी देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,विर्शि, आमगाव,सावंगी व इतर गावातील पूरबाधित शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळालेला नाही.
अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधीनांही मदतीची हाक दिली; पण आश्वासनाशिवाय काहीच मिळालेले नाही.ऑगष्ट,सप्टेंबर २०२३ मध्ये अतिवृष्टी झाली होती. सततच्या पावसामुळे नदी,नाल्यांना पूर आल्यामुळे तालुक्यातील बऱ्याच गावासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून धान पिकासह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या बाबीला आता ९ महिन्यांचा कालावधी निघूनही त्यांना मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे पूर पीडित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा आजही कायम आहे.शासन-प्रशासनाने याची दखल घेऊन नुकसानभरपाई देण्यात यावी; अशी मागणी अनेकांनी केली होती.मात्र,त्याचा काहीही उपयोग झालेला नाही.पुरामुळे गर्भावस्थेत असलेले धानाचे पीक पूर्णतः उद्धवस्त झाले.जवळपास ७६४.०३ हेक्टर क्षेत्रातील धानाची नासाडी झाली होती.याचा अनेक शेतकऱ्यांना फटका बसला. अतिवृष्टी झाल्याने धरणातील पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात आले होते.त्यामुळे मोठा पूर आला. पुरामुळे अनेक गावांतील शेतात पाणी शिरून खरीप हंगामातील धानासह इतर पिकांचे नुकसान झाले. तसेच धानावर गढूळ पाणी व धान पाखर झाल्याने मोठे नुकसान झाले.नुकसान होऊनही भरपाई केव्हा मिळणार? याकडे शेतकरी बांधव टक लावून वाट बघत आहेत.

