उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यातील फरी येथील महानंदा दिनेश मोहुर्ले नामक महिलेस ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतामध्ये काम करीत असतांना ‘टी-१४’ वाघिणीने हल्ला चढवून ठार केले होते.त्यानुसार गावातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी एकच जमाव करून वाघ,वाघीण व जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्यात यावा; अन्यथा वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचा मृतदेह शविच्छेदनासाठी नेण्यास नागरिकांनी मज्जाव केला होता.त्यानुसार वडसा वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक(ACF) मनोज चव्हाण यांनी ‘रेस्कु टीम’ ला पाचारण करीत वाघिणीची शोध मोहीम राबविली असता आज १७ सप्टेंबर २०२३ रोजी अखेर ६ दिवसांनी ‘टी-१४’ वाघिणीला पकडण्यास वन विभागास यश आले आहे.
सदर वाघीण शिवराजपुर जवळील चिखली रिठ येथील कक्ष क्रमांक-८६६ येथून आज सकाळी ६.४५ वाजेच्या दरम्यान जेरबंद करण्यात आली आहे.सध्याच्या घडीला कोंढाळा-उसेगाव,फरी व इतर जंगल परिसरात ‘टी -२’ वाघिणीचे पिल्ले व इतर वाघांचे वास्तव्य असल्याची माहिती आहे.त्यानुसार ‘टी -२’ वाघिणीचे पिल्ले मोठे झाल्यास जंगल परिसरात स्वतंत्र भ्रमंती करीत असतात. त्यातीलच एक दीड वर्षाची मादी म्हणजेच ‘टी-१४’ वाघिणीने फरी येथील महिलेस शेतात काम करीत असतांना ठार केले होते. त्यानुसार गावकऱ्यांचा रोष पाहून वाघिणीला जेरबंद करून नागपूर येथील गोरेवाडा याठिकाणी नेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.