उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-भंडारा,गोंदिया,गडचिरोली,चंद्रपूर या चार जिल्ह्यात धानाची लागवड करण्यात येते.परंतु,कधी अतिवृष्टी,कधी दुष्काळ,कधी किडीचा प्रादुर्भावामुळे धान शेती बेभरवशाची झाली आहे.परिणामी, शेतकऱ्यांना संकटाला सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून हमीभाव आणि बोनस दिला जातो.आणि यातूनच गैरव्यवहार होऊन शेतकरी पिचला जातो.
धान्याचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्यातील धान घोटाळ्याचे सत्र संपण्याऐवजी वाढतच आहे.सन २०२१ ते २३ या दोन वर्षांत ४०.३९ कोटी रूपयांचा धान घोटाळा उघडकीस आला.याप्रकरणी ११ संस्थांच्या पदाधिकाऱ्याविरुध्द गुन्हे नोंदविण्यात आले असून आणखी एका संस्थेविरूद्ध कारवाई होण्याची शक्यता आहे.केवळ एकट्या भंडारा जिल्ह्यातच धान घोटाळा होत आहे; असे म्हणणे चुकीचे आहे. सगळीकडेच घोटाळेबाज उदयास आले आहेत. अशातच आता गडचिरोली जिल्ह्यातीलही धान घोटाळे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भंडारा जिल्ह्यात धान घोटाळ्यांची मालिका २०११-१२ च्या सुमारास सुरू झाली.मागील दोन वर्षांत संत रविदास मागासवर्गीय सेवा सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था तुमसर,आधार सेवा सहकारी संस्था पवनी,अन्नपूर्णा सेवा सहकारी संस्था बपेरा,विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आंबागड,विविध सेवा सहकारी संस्था नाकाडोंगरी, विविध सेवा सहकारी संस्था वाहणी,माँ शारदा सेवा सहकारी संस्था मुंढरी बुज.,एकता सहकारी संस्था बेला,आकांक्षा सेवा सहकारी संस्था तुमसर,पुष्पाअमृत सेवा सहकारी संस्था बेलाटी, राष्ट्रसंत सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था गवराळा आदींचा समावेश आहे.या दोषी संस्था चालकांविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
२०२१-२२ आणि २०२२-२३ या खरीप व रब्बी हंगामात वरील संस्थांनी ४ लाख ४७ हजार ४३६ क्विंटल धानाची खरेदी केली होती.यापैकी ३ लाख १० हजार ६४७ क्विंटल धानाची राइस मिलमालकांनी उचल केली.त्यामुळे १ लाख ३६ हजार धानाची संस्थाचालकांनी परस्पर विल्हेवाट लावली. चौकशीअंती ही तूट दिसून येताच जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हे नोंदविण्यात आले. संबंधित संस्थाचालकांनी ४० कोटींची परतफेड न केल्यास संस्थाचालकांनी पणन विभागाकडे जमा केलेले १० लाख रूपये रोख आणि ५० लाख रूपयांची मालमत्ता जप्त करून या मालमत्तेचा लिलाव केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

