- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
वर्धा :-जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील विविध गावात दहशत माजवणाऱ्या वाघिणीला पकडण्यात वनविभागास यश आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.विशेष म्हणजे,वाघिणीने समुद्रपूर तालुक्याच्या पिंपळगाव,उंदीरगाव,साखरा, जोगिनगुफा या गावांमध्ये दहशत निर्माण करून आतापर्यंत अनेक जणावरांना ठार केले होते.वाघिणीची दहशत लक्षात घेता आज,रविवार १९ जुलै रोजी सकाळच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील ढोणे यांच्या नेतृत्वात वन्यजीव बचाव केंद्र गोंदिया येथील एनएनटीआरची चमू तसेच वनविभागाच्या वतीने शिवणफळ बिटामध्ये शोध मोहीम राबवून कक्ष क्रमांक-३१९ मध्ये वाघिणीला जेरबंद करण्यात मोठे यश आले.
पकडण्यात आलेली वाघीण गिरडच्या राणी टीएफ-१ चा बछडा असून दोन वर्षांपूर्वी गिरड परिसरात राणी वाघिणीने चार पिल्लांना जन्म दिला होता.यातील एकाचा धोंडगावजवळ अपघाती मृत्यू झाला,तर दोन बछड्यांना वनविभागाच्या वतीने जेरबंद करण्यात आले होते. त्यावेळी या तिसऱ्या बछड्याला सुद्धा जेरबंद करण्याची परवानगी मिळाली होती.मात्र,या वाघिणीचा कोणताही त्रास नसल्याने त्यावेळी पकडण्यात आले नव्हते.मात्र,ही वाघीण दोन वर्षाची होताच खुर्सापार जंगल सोडून गिरड परिसरात दहशत माजवत होती.अश्यातच गेल्या काही दिवसांपासून वाघिणीने गिरड परिसरातील पाच गावांमध्ये दहशत निर्माण करून काही जनावरांना ठार तर काहींना जखमी केले होते.यामुळे या वाघिणीला पकडण्याची मागणी करण्यात येत होती.परिस्थिती लक्षात घेता उपवनसंरक्षक हरविर सिंग,सहाय्यक वनसंरक्षक हरीष सरोदे यांनी प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवताच वाघिणीला पकडण्याची परवानगी मिळाली. वनविभागाने वाघिणीला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते.या वाघिणीला पकडण्यासाठी वापरलेल्या एका जनावराला ठार करताच वनविभागाची चमू ॲक्शन मोडवर आली आणि शेवटी वनविभागाच्या चमूला आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास जेरबंद करण्यात यश मिळाले.
- Advertisement -

