उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- ब्रह्मपुरी येथून एसटी बस प्रवाशांना घेऊन चंद्रपूरकडे जात असताना बस चालकाला फिट आल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने पाच वाहनांना धडक देत एका गॅरेजमध्ये शिरली. या घटनेत सहाजण गंभीर जखमी झाले असून सात प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना जिल्ह्यातील सिंदेवाही येथे घडली.जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
ब्रह्मपुरी आगाराची बस ३५ प्रवाशांना घेऊन चंद्रपूरकडे निघाली होती.बसचालक सचिन कुळमेथे यांना सिंदेवाही शहरातील पेट्रोल पंपाजवळ फिट आली,असे प्रवाशांनी सांगितले आहे.फिट आल्याने कुळमेथे यांचे बसवरील नियंत्रण सुटले.नियंत्रण सुटलेल्या बसने मार्गातील दोन दुचाकी,एक ट्रॅक्टर आणि दोन चारचाकी वाहनांना धडक दिली.या धडकेत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.वाहनांना धडक दिल्यानंतर बस थेट एका गॅरेजमध्ये शिरली.या भीषण अपघातात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.मात्र धडक दिलेल्या वाहनांचे आणि गॅरेजचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत सहा प्रवाशी गंभीर तर सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमी असलेल्या चौघांना चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. किरकोळ जखमी असलेल्या जखमीवर सिंदेवाही येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहेत.

