- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- जिल्ह्याच्या बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावरील विसापूर येथील चुनाभट्टीजवळ एका नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने अचानकपणे झडप घातली आणि जबड्यात पकडून बॉटनिकल गार्डनच्या उंच भिंतीवरून आत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र,नागरिकांनी आरडाओरड केल्याने चिमुकला थोडक्यात बचावला. पण,मुलाच्या मानेवर जखमा झाल्याने त्याला उपचारासाठी चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.ही घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारच्या रात्री उशिरा घडली.कार्तिक संजय जाधव वय ९ वर्षे,असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.तो हैदराबाद येथील रहिवासी असून नुकताच बल्लारपूर येथील आत्याच्या घरी आला होता.
कार्तिक हा कुटुंबीयांसोबत शनिवारच्या रात्री माता महाकालीच्या दर्शनासाठी पायी जात होता.सर्वजण जात असतांनाच विसापूर येथील चुनाभट्टीजवळील वळण रस्त्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे त्याच्यावर झडप घातली.अचानक झालेल्या बिबट्याच्या हल्ल्याने कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली.हल्ल्यानंतर बिबट्याने कार्तिकला जबड्यात पकडले आणि बॉटनिकल गार्डनच्या उंच भिंतीवरून उडी मारून त्याला आत नेण्याचा प्रयत्न केला.कार्तिक बिबट्याच्या तावडीत सापडल्याचे लक्षात येताच उपस्थित नागरिकांनी जोरदार आरडाओरड सुरू केली.नागरिकांच्या आवाजामुळे बिबट्याने भिंतीवरून उडी मारतांना कार्तिकला सोडून दिले.घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे आणि बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पीआय बिपीन इंगळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वनविभाग व पोलिसांच्या पथकाने रात्रीच संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. परिसरात शोध घेतला असता कार्तिक बॉटनिकल गार्डनच्या भिंतीजवळ आढळून आला.बिबट्याच्या हल्ल्यात त्याच्या मानेवर जखमा झाल्याने त्याला तातडीने रात्रीच पावणे बाराच्या दरम्यान उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
- Advertisement -

