उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या ५ किमी अंतरावर असलेल्या गडचिरोली-साखरा दरम्यानच्या गोगाव येथील डांबर प्लांटमधील साईबाबा मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीचा २४ हजार रुपये किंमतीची चांदीची छत्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना काल,शनिवारी ६ जुलै ला सकाळच्या सुमारास उघडकीस आली.या घटनेची तक्रार गडचिरोली पोलिस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. गडचिरोली-साखरा मार्गावर गोगावजवळ साईबाबा मंदिर आहे.येथे अनेक भाविक मंदिरात दर्शनासाठी जातात.हे मंदिर परिसरातील नागरिकांचे श्रद्धेचे स्थान आहे.विशेषतः साईबाबांच्या मूर्तीवर भाविकांनी चांदीचे छत्र चढविले होते.ज्याची किंमत २४ हजार रुपये असल्याची माहिती आहे.दरम्यान,शनिवारी सकाळी अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून चांदीची छत्री चोरून नेली.ही बाब निदर्शनास येताच मंदिर समितीच्या सदस्यांनी गडचिरोली पोलिस ठाणे गाठून घटनेची तक्रार दाखल केली.त्यानुसार गडचिरोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

