- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-एका छोट्याश्या चुकीने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडल्याची घटना आज,शुक्रवार २३ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास लाखांदूर तालुक्याच्या नांदेड गावात उघडकीस आली.चुलीत लावलेली लाकडे विझल्याचे समजून घरातील डिझेल साठवलेल्या बॅरेलजवळ ठेवण्यात आली.अश्यातच लाकडातील विस्तवाने पेट घेत तब्बल ४० लिटर डिझेलच्या बॅरेलला गाठताच आगीने क्षणात रौद्ररूप धारण करून बॅरेलचा स्फोट झाला.यात नांदेड येथील रहिवासी मिथून गोपीचंद बावनकर यांच्या संपूर्ण घराला आगीच्या ज्वाळांनी वेढल्याने दोन मोटारसायकली आगीच्या भक्ष्यस्थानी पडून पूर्णतः जळून खाक झाल्या,यासह घरात बसविलेले फ्रिज,एसी सह वर्षभराची कमाई,शेतातील साठा,कपडे, भांडी आणि महत्त्वाच्या कागदपत्रांचा अक्षरशः कोळसा झाला.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बावनकर कुटूंबीय उघड्यावर आले आहे.आगीचे रौद्ररूप इतके भीषण होते की गावकऱ्यांनी जोरजोराने आरडाओरड करून घटनास्थळाकडे धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.बऱ्याच वेळा पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणल्या गेली.घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.तोपर्यंत संपूर्ण साहित्ये जळून खाक झाली होती.
- Advertisement -

