उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनीचा शाळेतील स्वच्छतागृहात विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवारी ३ जुलै रोजी सकाळी १० च्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत घडली.यशस्वी सोपान राऊत वय ६ वर्षे असे घटनेतील मृत बालिकेचे नाव आहे.
यशस्वीने यावर्षी गावातीलच जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता पहिल्या वर्गात प्रवेश घेतला होता.१ जुलै रोजी नवीन सत्राच्या शाळा सुरू झाल्या. यशस्वी पहिल्या दिवसापासून शाळेत नियमित हजर होती.आज,बुधवारी सकाळी यशस्वी शाळेत गेली होती.तिथे ती स्वच्छतागृहात गेली असता,तिचा स्पर्ष सॅनिटरी पॅड डिस्पोज करणाऱ्या तारांना झाला.यामुळे विजेचा तीव्र धक्का बसून तिचा जागीच मृत्यू झाला.
अन्य विद्यार्थिनी या स्वच्छतागृहात गेल्या असता, त्यांना यशस्वी बेशुद्धावस्थेत पडलेली आढळून आली. विद्यार्थीनींनी घटनेची माहिती तात्काळ शिक्षकांना दिली.शिक्षकांनी तिला तातडीने उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र,वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले.शाळेला सुरुवात होऊन काहीच दिवस झाले असतानाच मृत्यू झाल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.या घटनेची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.