- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-पूर्वीसारखा वाघाचा धुमाकूळ कमी असला तरीही भय इथले संपत नाही.असाच प्रकार काल,गुरुवारी ५ जून रोजी आरमोरी तालुक्याच्या पोर्ला वनपरिक्षेत्रातील देलोडा जंगल परिसरात उघडकीस आला आहे.एका ५५ वर्षीय निरपराध महिलेला वाघाने ठार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.मीरा आत्माराम कोवे रा.सुवर्णनगर,देलोडा ता.आरमोरी असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
माहितीनुसार,उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करणाऱ्या मीरा कोवे या गुरुवारी सकाळच्या सुमारास गावालगतच्या जंगल परिसरात टोळी वेचण्यासाठी गेल्या होत्या.अश्यातच त्याच जंगल परिसरातील मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना सर्वप्रथम वाघाचे दर्शन झाले होते.त्यामुळे सदरची माहिती नागरिकांनी गाव परिसरात दिली होती.त्यातच टोळी वेचण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या मिरा कोवे या सकाळपासून दुपार व्हायला आली तरी घरी परतल्या नव्हत्या.त्यामुळे नागरिकांना वाघाचे दर्शन झालेली बातमी कुटुंबीयांच्या कानावर पडली होती.यात शंका बळावल्याने वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी व नागरिकांनी जंगल परिसरात दुपारी चार वाजताच्या सुमारास शोधाशोध सुरू केली असता,मीरा कोवे यांना वाघाने ठार केलेला मृतदेह आढळला.वन विभागाने पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.घटनेने परिसरात भीती पसरली असून परत पुन्हा अनुचित घटना घडू नये, याकरीता वनविभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
- Advertisement -

