- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागांत धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होताच तक्रारींची तात्काळ दखल घेत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी तालुका कृषी अधिकारी गेडाम यांच्यासोबत आज,गुरुवार १७ सप्टेंबर रोजी आरमोरी येथील विश्रामगृहात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या विविध तक्रारी व समस्या कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत धान पिकाचे नुकसान टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करणे तसेच प्रत्यक्ष गावागावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे अत्यावश्यक असल्याचे आमदार मसराम यांनी सांगितले.
यासंदर्भात आमदार मसराम यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली प्रीती हिरळकर तसेच कृषी विकास अधिकारी गडचिरोली खोमणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून धान पिकावरील रोगाची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
“आज आपण तातडीने उपाययोजना केली नाही,तर पुढील १५ ते २० दिवसांत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासही हिरावला जाऊ शकतो.कृषी विभागाने विलंब न करता गावागावात पोहोचून धान पिकाची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व आवश्यक उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात,” असे आमदार मसराम यांनी स्पष्ट केले.
दरम्यान,पूर्वी शेतकऱ्यांना औषधे,खते आणि इतर कृषी निविष्ठा अनुदानावर उपलब्ध होत होत्या.मात्र आता अनेक योजनांचा लाभ केवळ शेतकरी गटांपुरता मर्यादित राहत असल्याने सामान्य शेतकरी या सुविधांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.अनुदानावरील औषधे,खते व आवश्यक कृषी निविष्ठांचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे,असे मत व्यक्त करत आमदार मसराम यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.शेतकऱ्यांच्या अडचणींकडे गांभीर्याने पाहून शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे,असेही मसराम यांनी यावेळी सांगितले.
- Advertisement -

