उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रातील धान्य घोटाळा उघडकीस येऊनही ८ संस्थांविरूद्ध कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केल्याप्रकरणी राज्य सहकारी पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांना निलंबित केले आहे.
धान्य घोटाळ्यातील गैरव्यवहारात दोषी अधिकाऱ्यांवर निलंबन सत्र सुरू असून आतापर्यंत या प्रकरणात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील चार अधिकारी निलंबित झाले आहेत.मागील महिन्यात तत्कालीन भंडारा जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण पाटील व गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन पणन अधिकारी मनोज वाजपेयी यांना निलंबित करण्यात आले होते. दरम्यान गणेश खर्चे यांना भंडारा जिल्हा पणन अधिकारी म्हणून दुसऱ्यांदा पदभार देण्यात आला होता.जिल्हा पणन अधिकारी खर्चे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील ८ संस्थांनी धान खरेदी करण्यात अनियमितता केली.
त्यामुळे पणन महासंघाला २८.३९ कोटी रुपयांचा फटका बसल्याचे चौकशीतून समोर आले.परंतु,गणेश खर्चे यांनी त्या संस्थांविरूद्ध कारवाई केली नाही. केंद्रानी धान खरेदी केल्यानंतर भरडाईसाठी देताना तुट आल्याचे दिसून आले.याबाबत करण्यात आलेल्या चौकशीअंती अहवालात जिल्हा पणन अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला.या सर्व प्रकरणांत कर्तव्यात कसूर, दुर्लक्षितपणा केल्याचे दिसून आले.याप्रकरणी खर्चे यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर तसे आदेश व्यवस्थापकीय संचालक डॉ.सुग्रीव धपाटे यांनी दिले.