- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-काही महिन्यांपूर्वी झालेल्या वादाचे राग मनात धरून एका ग्रामपंचायत सदस्याची पूर्वी मित्र असलेल्या तरुणाने चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची घटना रविवार २३ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देव्हाडी गावात घडली होती.अंकुश श्रीमंत साठवणे वय ३६ वर्षे,रा.देव्हाडी,ता.तुमसर असे हत्या झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे तर आरोपी रामेश्वर उर्फ मुन्ना बिरणवारे हे दोघे चांगले मित्र होते.अशातच आता हत्या प्रकरणात मोठी माहिती पुढे आली आहे. ग्रामपंचायत सदस्य अंकुश साठवणे यांची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.जीवलग मित्रानेच अंकुशच्या घरी जाऊन धारदार चाकूने सपासप सात ते आठ वार केले.यात अंकुशचा जागीच मृत्यू झाला.आठ महिन्यांपासून मारेकरी रामेश्वर ऊर्फ मुन्ना बिरणवारे हा अंकुशच्या शोधात होता,अशी माहिती पुढे आली आहे.दरम्यान,न्यायालयाने बिरणवारे याला २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
अंकुश हा नागपूरला राहण्यासाठी गेला.परंतु काल,शनिवारी २२ मार्चला ग्रामपंचायतची बैठक असल्याने अंकुश देव्हाडी येथे आला होता. रविवारी,अंकुशच्या वडिलांनी आरोपीला समझोता करण्याकरिता घरी बोलावले होते.बिरणवारे हा आपल्या घरून धारदार शस्त्र लपवून अंकुशला भेटण्यासाठी घरून निघाला.अंकुशच्या घरचे दार बंद होते.त्याने दार ठोठावले.अंकुशची पुतणी हिने काका, दार उघडू नका..! अशी विनवणी केली.परंतु अंकुशने न ऐकताच दार उघडले.दार उघडताच रामेश्वरने अंकुशच्या पोटावर, मांडीवर व पाठीवर सात ते आठ सपासप वार केले.बचावासाठी आलेली पुतणी आकांक्षी संतोष साठवणे वय १५ वर्षे ही धावून आल्याने तिच्या कमरेला चाकू लागला.त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.अंकुशला तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.मात्र, उपचारादरम्यान अंकुशचा मृत्यू झाला.अंकुशची हत्या केल्यानंतर रामेश्वर हा आपल्या घरी गेला.रक्ताने माखलेले कपडे बदलले.त्यानंतर सायंकाळी ५ वाजताच्या प्रवासी रेल्वे गाडीने भंडारा रोड येथे गेला.भंडारा रोड येथून पुन्हा रामेश्वर हा तुमसर येथे बसने परत आला.त्यानंतर त्याने पोलिसांना स्वतःहून आत्मसमर्पण केले.बिरणवारे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१),१०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेच्या दिवशी अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातखडे,उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिली होती.ग्रामपंचायत सदस्य असलेला अंकुश साठवणे हा अविवाहित होता.त्यातच त्याचा जिवलग मित्र रामेश्वर बिरणवारे याच्या पत्नीशी त्याचे अनैतिक संबंध असल्याने दोघांमध्ये खटके उडत असल्याची चर्चा परिसरात सुरू होती.त्यामुळेच रामेश्वर याने हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
- Advertisement -