उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज :- गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने धरण सुरक्षेच्या दृष्टीने व धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता धरणातून आवश्यकतेनुसार टप्प्या-टप्प्याने आज १६ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास १६ हजार ते १८ हजार क्युमेक्स पर्यंत विसर्ग सोडण्यात आला आहे.त्यानुसार विविध नदी नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढली व अनेक रस्ते बंद झाली.अशातच देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावापासून तीन किलोमटर अंतरावर पश्चिमेस असलेल्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने गावातील शेतकरी बांधवांची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी बांधवांवर मोठे संकट ओढवले आहे.
कोंढाळा गावातील शेतकरी बांधवांच्या जवळपास शेकडो हेक्टर शेती पुरबाधित झाल्याने उभे असलेले शेतातील संपूर्ण धानपिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.संपूर्ण धानपिक नष्ट झाल्यास कित्येक शेतकरी बांधवांनी कर्ज काढून वखरणी,पेरणी,रोवणी व धानपिक होण्याची आशा बाळगून शेतीसाठी एकरी २० हजार रुपये खर्च केला.मात्र कृत्रीमरीत्या आलेल्या महापुराने शेतकरी बांधवांच्या सर्व आशेवर पाणी फेरल्या गेले आहे.पुरामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण धानपिक भुईसपाट होणार की काय?अशा वेळेस शेतकरी बांधवांनी काय करावे? असा विचार मनात घर करून सोडत आहे.
शेतीसाठी एकरी २० हजार रुपये खर्च करून शासन स्तरावरुन केवळ तुटपुंज्या स्वरूपात नुकसानभरपाई दिली जाते.शेतकरी बांधव कितीही राब-राब राबून नशीब फाटके ते फाटकेच असते.कधी किडीचा प्रादुर्भाव तर कधी अवकाळी पाऊस,कधी पावसाची कमतरता तर कधी पुराचा फटका व इतर अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. कृत्रिमरीत्या आलेल्या महापुराने कोंढाळा येथील शेतकरी बांधवांचे संपूर्ण धानपिक नष्ट झाल्यास यांस जबाबदार कोण? काही शेतकरी बांधवांनी धानपिका सोबतच तुर,भाजीपाला व इतर पिके लावली आहेत. अशातच पुराचा फटका बसल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.