उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- जिल्ह्यातीलशेतकरी बांधवांच्या कृषी पंपाच्या विद्युत पुरवठयाचे ८ तासाचे भारनियमन रद्द करून १६ तास विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासंबंधाने आज ३ फेब्रुवारी रोजी जिल्हा ओबीसी काँग्रेस कमेटी तथा काँग्रेस कमिटी देसाईगंजच्या वतीने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता देसाईगंज यांच्या मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांस निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले की, गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम,अतिसंवेदनशील व आदिवासी जिल्हा असुन जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग धंदे नाहीत.जिल्ह्यातील नागरिकांच्या उपजीविकेचे साधन केवळ धानपीक असून जिल्ह्यातील ९०% नागरिक धान पिकवरच अवलंबून आहेत.मागील तीन वर्षापासून शेतकरी बांधव सततच्या नापिकीला सामोरे जाऊन शेतकरी बांधवांनी यावर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई काढण्यासाठी उपलब्ध सिंचन सुविधेच्या भरवश्यावर मोठ्या प्रमाणात रब्बी धान पीकाची लागवड केली असून यासाठी किमान १६ तास विद्युत पुरवठ्याची आवश्यकता आहे.मात्र महावितरण कंपनीने केवळ ८ तास विद्युत पुरवठा व ८ तास भारनीयमन घोषित केल्याने शेतकरी बांधवांचे धानपिक नष्ट होण्याची शक्यता बळावली असल्याने कृषी पंपांना सुरळीत १६ तास वीज पुरवठा करण्याची तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकार असतांना मागणी करण्यात आली होती.
कृषी पंपाना ८ तास वीज पुरवठ्याचा निर्णय अतिशय गंभीर व शेतकऱ्यांना पुरते उध्वस्त करणारा असल्याने घेण्यात आलेला निर्णय तत्काळ रद्द करून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या कृषी पंपाना किमान १६ तास सुरळीत विज पुरवठा करण्यात यावा; अन्यथा महावितरण कार्यालयाला घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याचे दीलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन सादर करतेवेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष नंदु नरोटे,ओबीसी काँग्रेस कमिटीचे सचिव मनोज ढोरे,ज्येष्ठ नेते परसराम टिकले तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,उपाध्यक्ष नितीन राऊत,देसाईगंज युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकु बावणे,मनोहर निमजे,बालाजी ठाकरे,सुरेश मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,विलास बन्सोड,मंगेश गणविर,टिकाराम सहारे,शामराव पारधी,सोमेश्वर दिवठे,यादव पारधी,सचिन ठाकरे व काँग्रस कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते.