- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-बऱ्याच कालावधीपासून दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घालत चालता-बोलता “नजर हटी चुराई स्कूटी” असे म्हणत देसाईगंज तालुक्याच्या परिसरातून वेगवेगळ्या दुचाकी चोरण्याचा सपाटा चालवला होता.यामुळे सर्वत्र भीतीचे सावट पसरलेले असतांनाच देसाईगंज पोलिसांनी दोन अट्टल दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून ६ दुचाकी वाहनांसह ३ लाख ७० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना गजाआड केले.अहेमद सलिमखान पठाण वय २१ वर्षे,रा.कमलानगर,देसाईगंज,जि.गडचिरोली व तुषार रतन लिल्हारे वय १८ वर्षे,रा.चिखली,ता.कुरखेडा, जि.गडचिरोली अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,१ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास देसाईगंजचे शेतकरी राजरतन मेश्राम आपल्या मुलासह रब्बी धान लागवडीसाठी एमएच ४९ बीएल ८६९९ क्रमांकाच्या स्कूटी या दुचाकीने पऱ्हे आणण्याकरीता तुकुम येथील शेतशिवारात गेले होते.दरम्यान,स्कूटी रस्त्याच्या बाजुला ठेवून दोनशे मिटर अंतरावर शेतात पऱ्हे डुलाई करत असतांना अवघ्या १५ मिनिटातच स्कुटी गायब झाल्याने मेश्राम यांनी क्षणाचाही विलंब न करता देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अजय जगताप यांना घडलेला घटनाक्रम भ्रमनध्वनी वरुन सांगुन शोधाशोध सुरु झाली.मात्र,स्कूटी चोरीचा सुगावा लागत नसल्याने ४ मार्च २०२६ रोजी तक्रार दाखल करण्यात आली.पोलिस निरिक्षक अजय जगताप यांनी सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक मनिष गोडबोले यांच्याकडे सोपवला.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मनिष गोडबोले यांनी आपल्या विश्वसनीय सुत्रांकडून माहिती प्राप्त करुन अट्टल दुचाकीचोर अहेमद पठाण आणि तुषार लिल्हारे या दोन आरोपींना अपराध क्रमांक-१०६/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) ३(५)अंतर्गत १८ मार्च रोजी अटक करुन सखोल चौकशी करिता न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली.त्यानुसार, तपासात फिर्यादी मेश्राम यांच्या दुचाकी स्कुटी वाहनासह तब्बल ६ वाहन चोरी केल्याची कबुली आरोपिंनी दिली. यात काळ्या रंगाची एक्टिवा स्कुटी किंमत ६० हजार रुपये,हिरो एचएफ डिलक्स किंमत ५० हजार रुपये, बजाज प्लॅटिना किंमत ४० हजार रुपये,होन्डा शाईन किंमत ७० हजार रुपये,हिरो स्प्लेंडर किंमत ७० हजार रुपये व होन्डा एक्टीवा किंमत ८० हजार रुपये असा एकुण ३ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना गजाआड केले.सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक अजय जगताप यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिष गोडबोले,पोलीस उपनिरीक्षक निरिक्षक अनिल डेरकर,पोलीस हवालदार राजू उराडे, शैलेश तोरपकवार यांनी पार पाडली.या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप आगरकर,पोलीस हवालदार नितेश कडव,जिवन हेडाऊ,अंकुश चौधरी यांचेसह पोलिस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.सदर चोरीला गेलेल्या वाहनाचे आवश्यक कागदपत्र सादर करुन वाहन मालकांनी तपास कार्यात मदत करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक जगताप यांनी केले आहे.
- Advertisement -

