- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात विशेष जनजागृती व ग्रामस्तरीय उपक्रम राबविण्यात येत आहे. सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था नागभीड व अलर्ट इंडिया मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तथा सहकार्याने सुरू असलेल्या या उपक्रमाला ग्रामसभांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत किमान २५० हून अधिक गावांमध्ये “कुष्ठभयमुक्त व कुष्ठरोग भेदभावमुक्त ग्राम” संकल्प करून शपथ घेण्यात आली.यावर्षी ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्यदिनी पार पडणाऱ्या तब्बल ३२ हुन अधिक ग्रामसभांनी याबाबत सर्वानुमते ठराव पारित करून आपल्या गावात कुष्ठांतेयासोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव अथवा दुर्व्यवहार केला जाणार नाही,असाही सामूहिक संकल्प केला आहे.
- ग्रामसभेत मांडल्या भेदभावाच्या समस्या👇
या उपक्रमांतर्गत कुष्ठांतेयांनी ग्रामसभांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.त्यांनी कुष्ठरोगामुळे कुटुंबात,समाजात आणि सार्वजनिक जीवनात येणाऱ्या भेदभावाच्या समस्या ग्रामस्थांसमोर मांडल्या.कुष्ठरोग हा उपचाराने बरा होणारा आजार असून,कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीपासून दूर राहण्याची किंवा त्यांच्याशी भेदभाव करण्याची आवश्यकता नाही,याबाबत ग्रामस्थांमध्ये संस्थेच्या पदाधिकारी यांनी जनजागृती केली.योग्य उपचार व नियमित औषधोपचारामुळे कुष्ठरोगावर नियंत्रण मिळविता येते,हा संदेशही या अभियानातून देण्यात आला.
- भेदभावाविरोधात ग्रामसभेचा सामूहिक निर्धार👇
ग्रामसभांमध्ये सर्वानुमते पारित करण्यात आलेल्या ठरावानुसार गावात कोणत्याही कुष्ठांतेयांसोबत इतर कोणत्याही कारणावरून भेदभाव केला जाणार नाही. कुष्ठांतेयांना कुटुंबात,समाजात आणि सार्वजनिक जीवनात समान हक्क व सन्मान मिळावा,यासाठी ग्रामस्तरावर प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गावात कुष्ठरोगाच्या कारणावरून भेदभाव किंवा दुर्व्यवहार होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची गांभीर्याने दखल घेऊन ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीच्या माध्यमातून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल,अशी हमीही ठरावातून देण्यात आली.
- गावाच्या दर्शनी भागात जनजागृती फलक👇
कुष्ठरोगाविषयीची भीती व गैरसमज दूर करण्यासाठी गावाच्या दर्शनी भागात ‘हे गाव कुष्ठभयमुक्त व कुष्ठरोग भेदभावमुक्त आहे’ अशा आशयाचे जनजागृती फलक लावण्याचा निर्णयही ग्रामसभांमध्ये घेण्यात आला. कुष्ठांतेयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी करून घेणे,त्यांच्यावरील सामाजिक कलंक दूर करणे आणि ग्रामस्तरावर समानता व मानवी प्रतिष्ठेचे वातावरण निर्माण करणे,हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
‘कुष्ठरोगाविषयी भीती नको,भेदभाव नको; उपचार, स्वीकार आणि सन्मान हवा’, असा संदेश या ग्रामसभांच्या माध्यमातून चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया, पालघर व नंदुरबार जिल्ह्यातील गावांमध्ये देण्यात आला.

- Advertisement -

