उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- दुर्गापूर येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये असलेल्या सेंट मायकल चर्च परिसरात शुक्रवारी रात्री १२.४० वाजताच्या सुमारास तीन अस्वलांनी धुमाकूळ घातला.चर्चमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या मोबाइलवरून व्हिडिओ बनवला. तीन अस्वल चर्चच्या आवारात फिरत होते. काही वेळानंतर अस्वल भिंतीवरून उडी मारून पलीकडे असलेल्या वस्तीत शिरले. गुरुवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
सेंट मायकल चर्च दुर्गापूर वस्तीच्या मध्यभागी आहे. त्यामुळे हे तिन्ही अस्वल लोकवस्तीच्या भागातून चर्चच्या परिसरात शिरले असावेत आणि लोकवस्तीच्या भागातून बाहेर गेले असावेत,असा अंदाज आहे.आठवडाभरापूर्वी गुरुवारी मध्यरात्री एक वाजता उर्जानगर ग्रामपंचायत प्रभाग क्र.६ मधील नेरी येथे हे तीन अस्वल कॉलनीच्या रस्त्यावर आले होते. अस्वल का आले,कसे आले? भविष्यात अस्वल वसाहतीत येऊ नयेत,यासाठी वनविभागाने उपाय योजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

