उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- भंडारा येथील पोलिस उपविभागीय अधिकारी बागुल यांच्यावर एका तरुणीच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांनी तिला शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप केला असून अधिकाऱ्याविरोधात भंडारा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.पीडित तरुणी लाखनी तालुक्यातील दगडी/कन्हेरी येथील रहिवासी आहे.लाखनी तालुक्यातील एक तरुणी नागपूर येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती.तिथे तिची ओळख एका तरुणासोबत झाली.ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.प्रेमात दोघांनीही आणाभाका घेतल्या.काही वर्षांनंतर तरुणीने प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.तरुणीला त्याच्यावर संशय आला.त्यामुळे तिने लग्नासाठी गळ घातली.त्यावेळी त्याने तिला नकार दिला.खचलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला.मात्र सुदैवाने ती बचावली.त्यानंतर तिने प्रियकराविरोधत तक्रार करण्याचा धाडसी निर्णय घेतला.तरुणी त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे एका महिलेसोबत गेली असता भंडारा उपविभागीय पोलिस अधिकारी बागुल यांनी या तरुणीला पुन्हा एकटे येण्यास सांगितले.तरुणीला पोलिस अधिकाऱ्याचा उद्देश न कळल्याने ती पुन्हा तक्रार देण्यासाठी बागुल यांच्याकडे गेली.त्यावेळी त्यांनी तिला तिचे काम करून देण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली.या प्रकारामुळे खचून गेलेल्या तरुणीने सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांना भेटून घडलेला सर्व प्रकार सांगितला.परमानंद मेश्राम यांनी या तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी थेट जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांची भेट घेतली.अखेर तरुणीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी बागुल यांच्या विरोधात ३५४ अ, ५०९ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

