उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-चंद्रपुरातील मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अन्देवार यांच्यावर अज्ञात युवकांनी गोळीबार केला आहे.ही घटना शहरातील मध्यवर्ती भागातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे आज,गुरुवारी दि.४ जुलै रोजी घडली.अन्देवार यांच्या पाठीवर गोळी लागली असून पोलिसांनी त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलवित आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला जुन्या वादातून झाला असल्याची माहिती आहे.८ ऑगस्ट २०२० मध्ये दारू व्यवसायाच्या वर्चस्वातून बल्लारपूर शहरात सूरज बहुरिया यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.पोलिसांनी त्या प्रकरणात अमन अन्देवार आणि आकाश अन्देवार याला अटक केली होती.२०२१ मध्ये आकाश अन्देवार याची जामिनावर सुटका झाली होती.त्यानंतर १२ जुलै २०२१ मध्ये आकाश अन्देवार यांच्यावर रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये बहुरिया समर्थकांनी गोळीबार केला होता.आकाशला त्यावेळी ३ गोळ्या लागल्या पण सुदैवाने तो बचावला होता.मात्र,अन्देवार बंधूंनी बहुरिया यांची हत्या केल्याने त्यांना संपविल्याशिवय स्वस्थ बसणार नाही; अशी भूमिका बहुरिया समर्थकांनी घेतली होती.
आज गुरूवारी दुपारी अमन अन्देवार हे मित्राच्या कार्यालयात रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये येत असताना अचानक २ युवक त्या ठिकाणी आले.एक युवक हा वाहनाजवळ थांबला होता तर दुसऱ्याने अन्देवार यांच्यावर गोळी झाडली आणि पळ काढला.जुन्या वादातून अन्देवार यांच्यावर जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.सदर घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली.पोलीसांनी घटनास्थळी गाठून जखमी अन्देवार यांना ताब्यात घेवून तातडीने उपचारार्थ नागपूरला हलविले आहे. पोलिसांनी परिसरात आरोपीच्या शोधार्थ मोहीम राबविली,परंतु आरोपींचा शोध लागला नाही.या घटनेमुळे रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.सदर घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

