उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- मागील गुन्ह्याचा तपास करायचा असल्याचे सांगून तांडा (धानोली) येथील २८ वर्षीय युवकाला बेदम मारहाण केल्याने पोलिस अधीक्षकांनी कोरपनाचे ठाणेदार संदीप एकाडे यांची सोमवारी तडकाफडकी जिल्हा नियंत्रणात कक्षात बदली केली.त्यांच्या जागेवर नवीन ठाणेदार म्हणून अजिंक्य तामडे यांची नियुक्ती झाली असून ते मंगळवारी ठाण्यात रुजू झाले.तांडा (धानोली) येथील रमेश मुनावत यांच्या घरी अवैध दारूसाठा असल्याच्या संशयावरून शुक्रवारी दि.७ जून च्या रात्री ७ वाजता कोरपनाचे ठाणेदार संदीप एकाडे व पोलिसांचे पथक गेले होते.दरम्यान, रमेश मुनावत यांचे पुतणे व तक्रारदार विपुल मुनावत हे घटनास्थळी आले.लहान मुलीशिवाय घरी कोणीच नाही,अशी माहिती पोलिसांना दिली.मात्र, ठाणेदारांनी शासकीय कामात अडथळा आणू नकोस,असे बजावले आणि काका रमेश मुनावत यांच्या घराची तपासणी केली.त्यानंतर तुझे घर कुठे आहे; अशी विचारून विपुल मुनावत यांच्याही घराची झडती घेतली; पण झडतीत काहीच आढळले नाही.त्यानंतर मागील गुन्ह्याचा तपास करायचा आहे; अशी सूचना देऊन विपुलला शनिवारी दि.८ जून ला ठाण्यात बोलावले.एका शिपायाला पट्टा घेऊन येण्यास सांगितले आणि विपुलच्या हाता-पायासह पाठीवर पट्ट्याने मारहाण केली.विशेष म्हणजे मारहाण करताना पोलिस निरीक्षक संदीप एकाडे हे ‘कांटा लगा गाणे म्हणत’ मारहाण करीत होते; अशी ऑडिओ क्लिप पुढे आली आहे.विपुल ठाणेदार याला विनवणी करीत होता.मात्र त्याचे काही न ऐकता अमानुष मारहाण सुरू होती.मात्र गावकऱ्यांना हा प्रकार कळताच त्यांनी १० जून रोजी दुपारी १२ वाजता पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट घेतठाणेदार एकाडे यांच्यावर कारवाई करावी; अशी मागणी केली होती.पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केल्याने सोमवारी ठाणेदार एकाडे यांची तडकाफडकी बदली झाली.

