उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज : – राज्यात सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या हाताला तात्पुरते पोट भरण्याइतके देखील काम मिळत नाही.खूप शिकून शेवटी बेरोजगार राहण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याने सर्वप्रथम सुशिक्षीत बेरोजगारांना कामावर घेण्यात यावे; अशी मागणी समाजवादी पक्षाचे देसाईगंज शहराध्यक्ष नरेश वासनिक यांनी केली आहे.
कोणत्याही शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना त्याच कार्यालयात मानधन देऊन कामावर ठेवले जाते.हा एकप्रकारे बेरोजगारावर अन्याय करणे आहे.संपूर्ण आयुष्य शासकीय नोकरीत घालवून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते,मग त्यांना नोकरीची गरज काय? त्याऐवजी सुशिक्षित बेरोजगाराला त्याची जास्त गरज आहे; सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम मिळाल्यामुळे त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवला जाऊ शकतो.
सुशिक्षित बेरोजगारांच्या या मागणीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विरोधी पक्षनेते अजित पवार,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गंभीरपणे लक्ष देऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून द्यावे; अशी मागणी समाजवादी पक्षाचे देसाईगंज शहराध्यक्ष नरेश वासनिक यांनी केली आहे.