उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :-शहरातील आदर्श न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनी मंगळवारला शाळेतून बाहेर निघाल्यानंतर अचानक गायब झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांनी देसाईगंज पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.
एक विद्यार्थी ही सातव्या वर्गात तर दुसरी मुलगी दहाव्या वर्गात शिकत आहे.मंगळवारला सकाळी त्या शाळेत गेल्या होत्या.परंतु शाळा सुटल्यानंतर त्या घरी पोहोचल्या नाहीत.यासंदर्भात शाळा प्रशासनाला माहिती दिल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता,दोघीही दुपारी १ वाजताच्या सुमारा अल्प विश्रांतीच्या काळात बाहेर पडतांना दिसून आल्या.
याबाबत कुटुंबीयांनी देसाईगंज पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.याप्रकरणी पोलिस निरीक्षक किरण रासकर यांना विचारणा केली असता,दोन्ही विद्यार्थिनी शाळेतून निघाल्यानंतर घरी पोहोचल्या.कपडे बॅगमध्ये भरून घराबाहेर निघाल्या.तेव्हापासून त्या बेपत्ता असल्याची माहिती दिली.बेपत्ता दोन्ही विद्यार्थिनींचा शोध देसाईगंज पोलीस प्रशासन घेत आहेत.एकाच वॉर्डात शेजारीच राहणाऱ्या दोन विद्यार्थिनी अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली असून तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.