उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर(वरोरा) : वडिलांच्या मृत्यूनंतर वारस म्हणून मुला-मुलींची नावे स्थावर मालमत्तेवर येत असतात.परंतु सख्या एका बहिणीचे नाव बनावट स्वाक्षरी करून खारीज करण्यात आले.याबाबत बहिणीने भाऊ व बहिणीविरुद्ध वरोरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
कल्पना गणेश ताटकुंडवार यांचे वडील देवराव रामचंद्र बोंदगुलवार यांच्या मृत्यूनंतर सामायिक मालकी व ताबा वहिवाट झाली.मिळकतीचे हिस्से-वाटण्या झाल्या नाहीत.कल्पना ताटकुंडवार यांनी हक्क सोडण्याचे पत्रही लिहून दिले नाही.शेगाव येथे भू. क्र. ३१९, ३०९, ३७१ या जमिनीच्या सातबाऱ्यावर सर्वांचे नाव होते.कल्पना ताटकुंडावर यांनी भावाला हिस्सा मागितला असता,त्यांनी नकार दिला.त्यामुळे न्यायालयात दाद मागण्याकरिता सातबारा मागितला असता, त्यात त्यांचे नाव आढळून आले नाही.
यानंतर या प्रकरणात तहसील कार्यालयातुन कागदपत्रे घेतले असता कल्पना ताटकुंडावर यांची स्वाक्षरी असलेले हक्क सोडण्याचे पत्र दिसून आले.त्यामधील त्यांची स्वाक्षरी नसल्याने खाजगी स्वाक्षरी तज्ञांकडे तपासणीसाठी पाठविले असता जमिनीच्या सातबाऱ्यावर बनावट स्वाक्षरी असल्याचा अहवाल प्राप्त झाला.बनावट स्वाक्षरी करून दस्तऐवज तयार केल्याचे पुढे आले.
सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणामध्ये प्रमोद देवराव बोंगुलवार, राजेश देवराव बोदगुलवार, मनोज देवराव बोंगुलवार, विजया बबनराव चेपूरवार, रेखा श्याम दंतुलवार, ज्योती विठ्ठल भीमनवार यांनी संगनमत करून बनावट स्वाक्षरी करून नाव कमी केले,अशी तक्रार कल्पना ताटकुंडवार यांनी वरोरा पोलिस स्टेशनमध्ये केली.
या तक्रारीवरून सहा व्यक्तीविरुद्ध कलम ४६८,४७०, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहेत.