उद्रेक न्युज वृत्त
भद्रावती (चंद्रपूर) :- गौतमनगर येथील रहिवासी विठ्ठल कृष्णाजी गारसे यांनी २२ जून २०२० रोजी तालुक्यातील चीचोर्डी येथील सर्व्हे क्रमांक १०२/३ मधील प्लॉट क्रमांक ३७ च्या फेरफार प्रकरणाबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागितली होती.
या अर्जावर जनमाहिती अधिकारी,वरोरा यांनी विहित मुदतीत अपिलार्थीस कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अपिलार्थी विठ्ठल गारसे यांनी २२ जुलै २०२० रोजी प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केली.मात्र प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी देखील प्रथम अपील अर्जावर सुनावणी घेतली नाही. त्यानंतर अपिलार्थी विठ्ठल गारसे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम १९ (३) नुसार आयोगाकडे दिनांक ७ सप्टेंबर २०२० ला द्वितीय अपील दाखल केली. त्यानुसार ११ जुलै २०२२ रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली.
त्या सुनावणीत जनमाहिती अधिकारी तसेच प्रथम अपिलीय अधिकारी अनुपस्थित होते.त्यामुळे राज्य माहिती आयोगाने शिस्तभंगाची कारवाई करून प्रथम अपिलीय अधिकारी व जन माहिती अधिकारी यांचेवर अपिलार्थीना दिलेल्या त्रासासाठी ५ हजार रुपये दंड व मागितलेली माहिती विनामूल्य देण्याचे आदेश दिले आहेत.