उद्रेक न्युज वृत
भंडारा : शंकरपट पाहण्यासाठी बाहेरगावी जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले.चोरट्यांनी भरदिवसा घर फोडून ७३ हजार रुपयांचे दागिने लंपास केले.ही घटना येथील खातरोडवरील तुळजाभवानी मंदिराच्या मागे लक्ष्मीनगरात सायंकाळी उघडकीस आली.
खात रोडवरील लक्ष्मीनगरात नरेंद्र मुकलवार यांच्या घरी तुषार रत्नाकर कुंभरे (३२) भाड्याने राहतात. गुरुवारी ते भंडारालगतच्या सिल्ली अंबाडी येथे सहपरिवार शंकरपट पाहण्यासाठी गेले होते.त्या वेळी घराच्या मुख्य द्वाराला व लोखंडी गेटलाही कुलूप लावले होते.मात्र,सायंकाळी ७ वाजता परत आले; तेव्हा घराचे दार फोडल्याचे लक्षात आले.घरात जाऊन बघितले असता घरातील कपाटातील दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले.
चोरट्यांनी चांदीच्या ३० जोड पायपट्या वजन ६०० ग्रॅम,किंमत २८ हजार सोन्याचे सात ग्रॅम वजनाचे मणी किंमत १७ हजार, तीन ग्रॅम सोन्याची अंगठी किंमत दहा हजार, बेसर वजन २ ग्रॅम किंमत ५ हजार, चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, नथ असा ७३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.या प्रकरणी भंडारा ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.पुढील तपास भंडारा पोलिस करीत आहेत.