- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-दुचाकीने स्वगावी जाण्यासाठी निघालेल्या तरुणाचा वाटेतच रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,सोमवार १ जून रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी-तुमसर राज्य मार्गावर घडली.दुचाकीने मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयाजवळून जात असतांना मागून आलेल्या एका अज्ञात भरधाव दुचाकीस्वाराने दुचाकीला कट मारला. यामुळे दुचाकीचे संतुलन बिघडले.तितक्यातच समोरून बस आली आणि अंगावरून गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.आकाश प्रकाश कटबर्ये वय २६ वर्षे, रा.हरदोली(झं),ता.मोहाडी,जि.भंडारा असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे; तर दुचाकीच्या मागे बसलेल्या अनिता मनोज कुर्वे वय ४० वर्षे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी भंडारा येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
आकाश कटबर्ये व त्याची मामी अनिता कुर्वे हे दोघेही एमएच ३६ एझेड ०६२८ क्रमांकाच्या दुचाकीने कौटुंबिक वादाची तक्रार नोंदवण्यासाठी मोहाडी पोलिस ठाण्यात गेले होते.तेथील प्रक्रिया पार पाडून हरदोलीला परत जात असतांनाच मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ एका अज्ञात भरधाव दुचाकीस्वाराने आकाशच्या दुचाकीला कट मारला. यामुळे दुचाकीचे संतुलन बिघडून अनिता कुर्वे रस्त्याच्या एका बाजूला फेकल्या गेल्या,तर आकाश हा समोरून येणाऱ्या एमएच ०६ बी डब्ल्यू १४३ क्रमांकाच्या हिरकणी बसच्या चाकाखाली आला.सदरची बस तुमसरहून नागपूरला जात होती.अपघात इतका भीषण होता की,आकाशचा जागीच मृत्यू झाला.घटनेच्या वेळी तिथून जाणाऱ्या पोलीस जीपचे चालक पृथ्वीराज राठोड यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने जखमी आकाश आणि अनिताला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.तपासणीनंतर डॉक्टरांनी आकाशला मृत घोषित केले,तर डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या अनिता कुर्वे यांना पुढील उपचारांसाठी भंडारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी दुर्योधन भुरे,लांजेवार, कल्पना फड आणि ज्योत्स्ना बनसुरे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमाव नियंत्रित करून परिस्थिती नियंत्रणात आणली.घटनेचा पुढील तपास मोहाडी पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

