उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज( गडचिरोली) :- एकीकडे देसाईगंज तालुक्याच्या काही भागांमध्ये वाघ,वाघीण यांची दहशत आहे.अशातच आता जंगली हत्तींनी धुमाकूळ घातला असल्याने सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकरी बांधव चिंतातुर झाले आहेत.मागील दोन महिन्यांपासून कुरखेडा,देसाईगंज,आरमोरी तालुका परिसरात संचारत असलेल्या रानटी हत्तींनी दोन दिवसांपूर्वी भगवानपूर शेतशिवारात धुमाकूळ घातल्यानंतर आता हत्तींनी पुन्हा देसाईगंज तालुक्याकडे मोर्चा वळविला आहे.तालुक्यातील विसोरा येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास हत्तींनी विहिरगावच्या शेताशिवारात प्रवेश करीत पीके पायाखाली तुडविली आहेत.यामुळे अनेक हेक्टर धान पिकांचे नुकसान झाले असून या हत्तींना तात्काळ हाकलून लावण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.
हलक्या व मध्यम प्रतीचे धानपिक आता अंतिम टप्प्यात येत असताना २० पेक्षा वरच्या संख्येत असणाऱ्या जंगली हत्तींचे कळप काल विहीरगावच्या नजीक असणाऱ्या मामा तलावाच्या खालील धानपिकाच्या शेतातून गेले.त्यामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाला आहे.यात प्रवीण डोनाडकर,बंडू बनकर, लीलाधर पिल्लेवान,सुधाकर बावणे,नांदाजी नारनवरे या विहीर गावच्या शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे अतोनात नुकसान झाले आहे.
एकीकडे शेतकऱ्यांना जंगलातील वाघाची भीती असताना आता रानटी हत्तींचाही धोका वाढला आहे. आतापर्यंत वाघाद्वारे या भागात कोणतीही हानी जरी नसली तरी शेतकऱ्याच्या जीवाला वाघापासून धोका आहे.त्यात आता जंगली हत्तींद्वारे धान पिकांची नासाडी केली जात असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.या पट्ट्यामध्ये धान पिकाचे सर्वात जास्त पीक घेतले जाते.धानपिक आता ऐन शेवटच्या टप्प्यात आले असताना हत्ती नुकसान करत असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे.जंगली हत्तींना पळवून लावण्यासाठी पश्चिम बंगाल येथील एक टीम येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले होते.मात्र अजूनही सदर टीम न आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.