उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-ओडिशा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेला जंगली हत्तींचा कळप देसाईगंज वनपरिक्षेत्रातील जंगलात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालत आहे.दरम्यान, हत्तींकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे सातत्याने नुकसान होत आहे. रविवारी रात्री या कळपातील दोन हत्ती भरकटल्याने त्या हत्तींनी चिखली गाव परिसरातील भात पिकांचे अतोनात नुकसान केले.सोमवारी सकाळी दोन हत्ती दिसल्याने चिखलीसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या संदर्भातील माहितीनुसार या रानटी हत्तींच्या कळपातील हत्तींची संख्या २३ च्या आसपास आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कळप देसाईगंज वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या विहीरगाव उपविभागाच्या जंगलात आहे.रविवारी रात्री कळपातील दोन हत्ती वेगळे होऊन चिखली गावातील शेताच्या आवारात पोहोचले.जिथे दोन्ही हत्तींनी रब्बी धान पिकाचे अतोनात नुकसान केले.सध्या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भात पिकांची पेरणी केली आहे.येत्या काही दिवसांत रोवणीच्या कामाला सरुवात होणार आहे.मात्र अशा परिस्थितीत जंगली हत्तींकडून पिकांचे नुकसान होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.सोमवारी सकाळी वनविभागाच्या पथकाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचून पंचनामा केला.

