उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- शहरातील गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समधील गोळीबारप्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी नऊ संशयितांना ताब्यात घेतले आहे. सर्वांचे इन कॅमेरा बयाण नोंदविण्यात आले.या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी नऊ पोलिस पथके गठीत करण्यात आली आहेत.आता हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे समजते.गोळी झाडणारा अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही.सुरज बहुरिया हत्याकांड कोळसा चोरीतून गोळीबार झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
गुरुवारी भरदुपारी एका अज्ञात इसमाने मनसे कामगारसेनेचा जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडली.गोळी पाठीत घुसल्याने अंधेवार जखमी झाले होते.चंद्रपूर शहर पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पंचनामा करीत सीसीटीव्ही फुटेज जप्त केले होते.त्या आधारावर शहर पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९,६१, (१), तसेच आर्म ॲक्ट ३,२५ अन्वये गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी शहर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वातील चमूने शुक्रवारी दुपारपर्यंत नऊ जणांना ताब्यात घेतले असले,तरी कुणालाही अटक केली नसल्याची माहिती आहे.
संशयितांची नावे पोलिसांनी गोपनीय ठेवली आहेत.या प्रकरणात जखमी झालेल्या अमन अंधेवार यांच्या पाठीतून नागपूर येथे शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात आल्याची माहित पोलिसांनी दिली.अमनची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
चंद्रपुरात गोळीबार करण्यात आलेला शूटर हा बाहेरून बोलविला असावा,असा अंदाज सीसीटीव्ही फुटेजवरून चंद्रपूर पोलिसांनी व्यक्त केला आहे.त्या आधारावर तपास सुरू केला आहे.या गोळीबारामागे बहुरिया हत्याकांड,अवैध कोळसा वाहतूक तसेच मनसे कामगार सेनेच्या अध्यक्षपदात केलेला बदल या सर्व बाबींच्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

