उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- रेल्वे रुळावरून पायी चालत शेताकडे जात असलेल्या विद्यार्थ्याला धावत्या रेल्वेने जोरात धडक देत फरफटत नेले.यात डोके शरीरापासून वेगळे झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.त्याच्या कानात मोबाइल फोनचे इअर फोन होते; अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.ही घटना रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनसर शिवारात काल,शुक्रवारी दि.५ ला सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
आर्यन किशोर केकती वय १७ वर्षे,रा.मनसर, ता. रामटेक असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.आर्यन शुक्रवारी सकाळी सायकलने एकटाच शेतात गेला होता.त्याने सायकल रेल्वे रुळालगत उभी केली आणि पायी शेताच्या दिशेने निघाला.त्यातच रामटेकहून नागपूरला वेगात जाणाऱ्या रेल्वेगाडीने त्याला जोरात धडक दिली.तो गाडीसोबत किमान ५० फुटांपर्यंत फरफटत गेला आणि नंतर चाकाखाली आला.त्यामुळे डोके शरीरापासून वेगळे झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
आर्यनने यावर्षीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्याला धाकटा भाऊ असून,आई व वडील शेतीसोबतच मजुरीचे काम करतात.आर्यन आईवडिलांना कामात हातभार लावायचा.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि आर्यनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

