उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज :- तालुक्यातील कोंढाळा येथील हेमराज बहुजी बुराडे या लाभार्थ्यास रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून २०२१-२२ मध्ये गुरांचा गोठा मंजूर झाला होता.त्यानुसार त्यांनी गुरांच्या गोठ्याचे बांधकाम पूर्ण केले.बांधकाम पूर्ण तर केले; मात्र अंदाजपत्रकानुसार काही कुशल रकमेची देयके प्रलंबित असतांनाही देसाईगंज पंचायत समिती रोजगार हमी योजना शाखेतील कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (APO)यांनी कुठलीही शहानिशा न करता आपल्याच मनमर्जीने पूर्णत्वाचा दाखला दिला ठोकून म्हणजेच ऑनलाईन वरती अपलोड केला असल्याने कोंढाळा येथील लाभार्थी आर्थिक संकटात सापडला आहे.
बुराडे यांना सन २०२१-२२ मध्ये गुरांचा गोठा मंजूर झाला होता.मंजूर अंदाजपत्रकानुसार अकुशल रक्कम १७,८९० रुपये तर कुशल रक्कम ६०,२३७ रुपये अशी मिळून एकूण रक्कम ७८,१२७ रुपये एवढ्या रकमेचा गुरांचा गोठा मंजूर करण्यात आला.त्यानुसार त्यांनी कुशलची रक्कम लवकर मिळत नसल्याने आपल्याकडील जमापुंजी गोळा करून बांधकाम पूर्ण केले.सुरुवातीला त्यांना अकुशल व कुशल असे दोन्ही मिळून ३९ हजार ४५० रुपये मिळाले व उर्वरित रकमेसाठी देसाईगंज पंचायत समितीच्या रोजगार हमी योजना शाखेत साहित्यांची प्रलंबित देयके व हजेरिपत्रक रोजगार सेवकाच्या सहाय्याने सादर केली.मात्र उर्वरित रकमेची देयके प्रलंबित असतांनाही कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी(APO)यांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता व वरिष्ठांना न कळवता आपल्याच मनमर्जिने काम पूर्णत्वाचा दाखला ऑनलाईन वरती अपलोड केला असल्याने आता लाभार्थ्यांने खरेदी केलेली साहित्यांची रक्कम इतरांना अदा करावी कशी?असा प्रश्न लाभार्थ्यास पडला आहे.एकदा पूर्णत्वाचा दाखला अपलोड केला की काम पूर्ण झाले; असे गृहीत धरल्या जाते.काम पूर्ण झाले तर देयके निघणार कसे?असा सवाल उपस्थित केला जातो.काम पूर्ण झाल्याचा पूर्णत्वाचा दाखला ना ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचा; ना पंचायत समितीच्या संवर्ग गटविकास अधिकाऱ्याचा; तर मग सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याने कशाच्या आधारावर पूर्णत्वाचा दाखला ऑनलाईन वरती अपलोड केलाय? त्यामुळे अश्या मुजोर कर्मचाऱ्याकडून लाभार्थ्याच्या उर्वरित साहित्य देयकांच्या रकमेची वसुली वा त्यावर कारवाई करण्यात यावी;अशी मागणी हेमराज बुराडे यांनी केली आहे.
कित्तेक वर्षांपासून ग्रामसभेने सुचविलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांच्या नियोजनांमध्ये लाभार्थ्यांचे नाव वर्षानुवर्षे नाव येत नाही.लाभार्थ्यांचे नाव नियोजनामध्ये आले तर काही कालावधी करीता पैस्या अभावी काम ठप्प स्वरूपात असते.अशातच काहीजण द्वेष भावना मनात बाळगून सर्वसामान्य नागरिक वा गोरगरिबांचे नुकसान करतांना दिसून येतात.असाच प्रकार हल्ली कोंढाळा येथील हेमराज बहुजी बुराडे यांच्या बाबतीत घडलेला असल्याने सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे.गुरांच्या गोठ्याच्या प्रलंबित देयकांवर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सदर लाभार्थ्याने म्हटले आहे.