उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली) :- आरमोरीतालुक्यातील कोजबी जवळील नदीकिनारी असलेल्या करपडा शेतशिवारात जंगली हत्तींच्या कळपातील एका हत्तीने प्रवेश करीत धान पऱ्हेची नासधूस केले.ही घटना काल,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.यामध्ये संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.मागील काही वर्षापासून जिल्ह्यात संचारित असलेल्या जंगली हत्तींचे कळप मागील काही महिन्यांपासून वडसा वनविभागांतर्गत येत असलेल्या आरमोरी वनपरिक्षेत्रात संचारत आहेत.अशातच २० ते २२ च्या संख्येत असलेल्या हत्तीच्या कळपातील एका हत्तीने तालुक्यातील कोजबी जवळील नदीकिनारी असलेल्या करपडा शेतशिवारात प्रवेश केला.या परिसरातील शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली होती.सदर पऱ्हे चांगले बहरावर आले असताना हत्तीने पऱ्हे पायदळी तुडविले.त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.यामध्ये मनोहर मुकुंदा मुल्लेवार यांनी रोवणीकरिता टाकलेल्या पह्यांचेही प्रचंड नुकसान झाले असल्याने त्यांनी वनविभागाने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

