उद्रेक न्युज वृत्त
मूल (चंद्रपूर):- गावाच्या विकासासाठी शासनाने १४वा वित्त आयोगातून ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचा निधी दिला.प्राप्त निधी त्याच वित्तीय वर्षात खर्च करावयाचा असतो.मात्र, १४वा वित्त आयोगाचा कालावधी संपला असतांनाही ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे लाखो रुपयांचा निधी अखर्चित होता. सरपंच,ग्रामसचिवाच्या दुर्लक्षामुळेच विकासकामांच्या निधीचा गैरवापर केंद्रचालकाने केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मूल तालुक्यातील ग्रामपंचायत जूनासूर्ला येथील केंद्रचालकाने सरपंच व ग्रामसचिवाच्या डिजिटल सिग्नेचरचा गैरवापर करून पीएफएमएस प्रणालीद्वारे १४वा वित्त आयोगातील निधी आपल्या खात्यात परस्पर वळता केला.केंद्रचालकाने केलेला गैरव्यवहार हा गंभीर स्वरूपाचा असल्याने अखेर प्रकल्प संचालकांनी सदर केंद्र चालकाला तात्काळ निलंबित केले.
डिजिटल सिग्नेचर ठेवण्याची जबाबदारी सरपंच, सचिवाची असताना केंद्रचालकाने डीएससीचा वापर करून निधी आपल्या खात्यात वळता कसा काय केला,सरपंच सचिव एवढे बेजबाबदार कसे? त्यामुळे सदर प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्यात यावी व सरपंच,सचिवावर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी गावातील नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे.तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच,ग्रामसचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने सरपंच,ग्रामसचिवाचे धाबे चांगलेच दणाणले आहे.त्यांच्यावर कोणती कारवाई होणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.