उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- जिल्ह्याच्या तुमसर शहरातील दाट लोकवस्तीतील संकिर्ण काँक्रिट रत्यावरील ब्रेकरचा अंदाज चुकून ऑटोरिक्षा उलटून; त्यात अवघ्या १६ महिन्यांच्या निरागस चिमुकल्याचा दबून मृत्यू झाल्याची घटना काल १६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे.हा धक्कादायक अपघात तुमसर शहरातील विवेकानंद नगरात घडला. रेहान रहमत शाह,असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
शाह परिवार घटनेच्या दिवशी कार्यक्रमाकरिता शहर वॉर्डातून ऑटो क्रमांक एम एच ४९ बीके ६९४२ ने येथे तिरोडी निघाले होते.त्यावेळी रहमत स्वतः ऑटो चालवत होता. तर चिमुकल्या रेहानला कुशीत घेऊन आई व दोन मुले मागे बसले होते.मिळालेल्या माहितीनुसार ऑटो ब्रेकरजवळ येताच रहमतने ब्रेक दाबला त्यावेळी ऑटोचे संतुलन बिघडले त्यातच आईच्या हातातून रेहान रस्त्यावर पडला व ऑटोने पलटी घेतली.त्यात निरागस रेहानच्या मेंदूचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.डोळ्यापुढे आपल्या बाळाला दगावल्याचे पाहून आईने हंबरडा फोडला.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

