- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-दुचाकीने बहिणीची भेट घेण्याकरिता निघालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ)जवानाची भेट अधुरी राहिल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात उघडकीस आली आहे.दुचाकीने जात असतांनाच चालत्या दुचाकीवर एका माकडाने उडी मारताच दुचाकी अनियंत्रित होऊन जवान खाली कोसळला.यात गंभीर दुखापत झाल्याने नागपूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.गंभीर मार लागल्याने उपचार सुरू असतांनाच त्यांचा मृत्यू झाला.गणेश ईश्वर वाढीवे वय ३५ वर्षे,रा.हरदोली, ता.तुमसर,जि.भंडारा असे अपघातात मृत पावलेल्या जवानाचे नाव आहे.सदरची घटना काल रविवारी सकाळच्या सुमारास दावेझरी मार्गावर घडली.
गणेश वाढीवे हे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत.काही दिवसांपूर्वी ते सुट्टीवर गावी आले होते. त्यांची बहीण आंबागड येथे राहत असल्याने काल रविवारी सकाळच्या सुमारास बहिणीला भेटण्यासाठी दुचाकीने निघाले होते.जात असतांनाच दावेझरी येथे माकडाने चालत्या दुचाकीवर उडी मारली.उडी मारताच गणेश वाढीवे हे दुचाकीसह मुख्य मार्गावर कोसळले. मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,उपचार सुरू असतांनाच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.गणेश वाढीवे यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,मुलगी,भाऊ आणि बहीण असा आप्त परिवार आहे.घटनेने वाढीवे परिवारावर मोठा आघात झाला असून गणेश वाढीवे यांच्या पार्थिवावर आज,सोमवार १५ सप्टेंबर रोजी हरदोली येथे अंत्यसंस्कार पार पडला.
- Advertisement -

