उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- तालुक्यातील मानेगाव (बाजार) येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेतून बुधवारी बोरगाव बुज.येथील शेतकरी भाऊराव नत्थु वाघमारे यांनी ५० हजारांची नगद राशी काढली आणि पीकविम्याचे कर्ज भरण्यासाठी इलाहाबाद बँकेत गेले. यावेळी एक ५०० रुपयांची नोट नकली असल्याचे व्यवस्थापकाने सांगितले.त्यामुळे शेतकऱ्याला धक्काच बसला.
बोरगाव बुज.येथील शेतकरी भाऊराव वाघमारे यांचेकडे इलाहाबाद बँकेचे पीकविमा कर्ज होते. त्यासाठी त्यांनी मानेगावच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून पन्नास हजार रुपये काढले.नोटाचे बंडल बांधले असल्यामुळे नकली नोटाची खात्री न करता भंडारा येथील इलाहाबाद बँकेत कर्ज भरण्यासाठी गेले असता नोट मोजण्याच्या मशीनमधून 8VH421965 या क्रमांकाची एक पाचशेची नोट बाहेर फेकण्यात आली.त्यामुळे मॅनेजर यांनी ही नकली नोट असल्याचे खात्री करून नोटेवर काळ्या पेनाच्या शाईने क्रॉस करून नोट स्वतःकडे जमा करून घेतली.त्यामुळे शेतकऱ्याला धक्का बसला असून विनाकारण पाचशे रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

