उद्रेक न्युज वृत्त
दिल्ली :- दिल्ली-एनसीआरमध्ये आजची सकाळ झाली तीच खळबळजनक बातमीने.देशाची राजधानी असलेल्या दिल्लीबरोबरच नोएडा आणि गुरुग्राममधल्या जवळपास ८० शाळांना धमकीचा ईमेल आला.शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी या ईमेलमधून देण्यात आली होती.ई-मेल मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली.दिल्ली पोलिसांनी तात्काळ सर्व शाळांमध्ये सर्च ऑपरेशन राबवले.डॉग आणि बॉम्ब स्क्वॉडच्या मदतीने प्रत्येक शाळेतील प्रत्येक वर्गात बारकाईने तपास करण्यात आला.या दरम्यान सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली.
हा मेल कोणी पाठवला आणि त्यामागे नेमका काय उद्देश होता; याबाबत पोलीस आता शोध घेत आहेत. हा ई-मेल कोणत्या आयडीवरुन पाठवण्यात आला आहे हे शोधण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेतली जात आहे.सुरुवातीच्या तपासानंतर धमकीचा ई-मेल देशाबाहेरून केला गेल्या असल्याचे उघड झाले.
दिल्ली पोलिसांच्या तपासात सर्व शाळांना धमकीचा एकसारखाच ई-मेल पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे.धमकीच्या ई-मेलमध्ये सर्वात शेवटी RU असे लिहिण्यात आले आहे.RU हे अक्षर रशियाच्या दिशेने इशारा करणारा आहे.पण सर्व ई-मेल रशियातूनच पाठवले गेले आहेत,याबाबत अंतिम निष्कर्ष निघालेला नाही.कदाचित आरोपींनी हा कट भारतात बसूनही रचला गेला असावा; असा पोलिसांना संशय आहे.
ज्या आयपी ॲड्रेसवरुन सर्व शाळांना धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला आहे; तो आयपी ॲड्रेस ट्रेस करण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत.आयपी ॲड्रेसचा शोध लागल्यास आरोपींना पकडणे सोपे होणार आहे.यासाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलबरोबरच सायबर पथकही याचा कसून शोध घेत आहे.

