- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय देशव्यापी बँक संपाच्या पार्श्वभूमीवर,सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका रविवार २७ सप्टेंबर २०२६ रोजी नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.याबाबत आज,बुधवार २३ सप्टेंबर रोजी अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले.महत्वाचे म्हणजे,२६ सप्टेंबर रोजी चौथा शनिवार असल्याने बँकेला सुट्टी असते.२७ सप्टेंबर हा रविवार असल्याने त्याही दिवशी सुट्टी.अश्यातच सोमवार २८ सप्टेंबर,२९ सप्टेंबर व ३० सप्टेंबरपर्यंत सलग पाच दिवस बँकांचे व्यवहार ठप्प पडून नागरिकांच्या बँकिंग गरजांवर दीर्घकाळ परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती.त्यातच,चालू आर्थिक वर्षातील पहिली सहामाही ३० सप्टेंबरला संपते.त्यावेळी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार पूर्ण करावे लागतात.मात्र, या संपामुळे आर्थिक व्यवहारांवर परिणाम व ग्राहकांची गैरसोय होऊ नये आणि महत्त्वाच्या बँकिंग सेवा सुरळीत सुरू राहाव्यात, यासाठी सरकारने रविवार २७ सप्टेंबरला बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.विशेष म्हणजे,भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँक शाखा,कार्यालये,एटीएम-लिंक शाखा आणि करन्सी चेस्ट यांना रविवार २७ सप्टेंबर २०२६ रोजी पूर्णपणे कार्यरत राहण्यास मंजुरी दिली आहे.संपाच्या काळात बँका बंद राहणार असल्या तरी मोबाईल बँकिंग,एटीएम,इंटरनेट बँकिंग आणि यूपीआय सेवा सुरु राहणार आहेत.

- Advertisement -

