उद्रेक न्युज वृत्त
बल्लारपूर(चंद्रपूर) :- बल्लारपूर शहरातील श्रीराम वॉर्डात सोमवारी एका बालकाला वानराने गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असताना काल,बुधवारी दिनांक- १३ मार्च रोजी सकाळी ८ वाजता कारवा मार्गावरील पंडित दीनदयाल वॉर्डातील आपल्या अंगणात खेळणाऱ्या सातवर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केला.या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.साफिया इकबाल शेख असे जखमी बालिकेचे नाव आहे.
पंडित दीनदयाल वॉर्डातील साफिया शेख ही बालिका अंगणात खेळत होती.हा परिसर कारवा जंगलाला लागून आहे.खेळण्यात दंग असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला केला.दरम्यान, काही लोकांना बिबट दिसल्याने त्यांनी आरडाओरड केला.आवाजाने बालिकेला सोडून देऊन बिबट्याने जंगलात धूम ठोकली.हल्ल्यात साफिया शेख ही गंभीर जखमी झाली.तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे,वन कर्मचारी कोमल घुगलोत व पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.सदर परिसरात कॅमेरे ट्रॅप लावण्यात आले.बल्लारपूर पेपर मिलचा बांबू स्टॉक यार्ड व दीनदयाल वॉर्ड परिसरात सदर बिबट काही दिवसांपासून धुमाकूळ घालत आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला.मात्र यावर त्वरित वनविभागाने आळा घालावा; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

