- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले आहेत.विशेष म्हणजे,मागील हंगामातील खरेदी केलेल्या धानाचा साठा महामंडळाने तब्बल सहा महिन्यांनंतरही गोदामातून उचललेला नाही.परिणामी, गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली असून नवीन धान साठवण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
शेतकऱ्यांनी अहोरात्र कष्ट करून रब्बीचे धान पदरात पाडून घेतले.आता धान काढून जवळपास महिनाभराचा कालावधी उलटला असतांनाही खरेदी प्रक्रिया ठप्प आहे.त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आपले धान घराच्या अंगणात,खळ्यात आणि शेतातील मोकळ्या जागेत ताडपत्री टाकून साठवून ठेवावे लागत आहे.
- मुख्य अडचणी आणि शेतकऱ्यांची फरफट👇
नियोजनाचा बोजवारा: दरवर्षी रब्बी हंगामात हीच समस्या निर्माण होत असतांनाही महामंडळाची यंत्रणा कोणतीही पर्यायी व्यवस्था किंवा आगाऊ नियोजन करत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
आर्थिक कोंडी: धान विक्री रखडल्यामुळे शेतकऱ्यांचे भांडवल अडकले असून,आगामी खरीप हंगामाच्या मशागतीसाठी आणि बियाणे खरेदीसाठी पैशांची जुळवाजुळव कशी करावी,असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
- अवकाळीची टांगती तलवार👇
सध्या मान्सूनपूर्व व अवकाळी पावसाचे दिवस आहेत. जर अचानक वादळी पाऊस झाला,तर उघड्यावर असलेला लाखो रुपयांचा सुवर्णकण(धान)मातीमोल होण्याची भीती आहे.शेतकऱ्यांच्या कष्टाची सुरक्षा आणि खरेदीची जबाबदारी असलेल्या यंत्रणाच आता उदासीन असल्याचा आरोप होत आहे.
- आंदोलनाचा इशारा👇
तात्काळ गोदामातील जुना धान्यसाठा मिलर्सकडे पाठवून रब्बी धान खरेदी केंद्रे युद्धपातळीवर सुरू करण्यात यावीत,अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.येत्या काही दिवसांत खरेदी सुरू न झाल्यास आणि पावसामुळे धानाचे नुकसान झाल्यास मोठे जनआंदोलन पुकारण्यात येईल,असा संतप्त इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
- Advertisement -

