- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुका मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंढाळा येथील सिंड्राई रेती घाटातील रेल्वे कामासाठी वाळू उपश्याचा दिलेला कालावधी संपल्यानंतर आता रेती तस्करांकडून रात्रीस अवैध वाळू उपश्याचा खेळ सुरू झाला आहे.विशेष म्हणजे,अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी “चेकपोस्ट आहे रस्त्यावर अन् रेती तस्कर कोंढाळा-रवी-अरसोडा चोरट्या मार्गावर” असे असतांनाही देसाईगंज महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी निद्रावस्थेत गेले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वैनगंगा नदी ज्या क्षेत्रातून वाहते,अश्या ठिकाणाहून बहती वाळूत रेती तस्करांकडून हात धुण्याचे प्रमाण वाढलेले आहे.गडचिरोली जिल्ह्यासह बाहेर ठिकाणी सर्वत्र वैनगंगा नदीच्या वाळूची मागणी आहे.त्यामुळे ‘रेती पाहिजे ती केवळ वैनगंगेचीच’ अशी अवस्था झाली आहे.अश्यातच देसाईगंज तालुक्याच्या वैनगंगा नदीतील सिंड्राई रेती घाटातून रात्रीच्या सुमारास अवैध वाळूचा उपसा केला जात आहे.येथील वाळूची परवान्याशिवाय चोरटी वाहतूक होत असून चेकपोस्ट प्रमुख मार्गावरच असल्याने आडमार्गाने तस्करांना वाळूची चोरटी वाहतूक करण्यास वाव मिळाला आहे.गडचिरोली जिल्ह्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक होऊ नये,शासनाचा महसूल बुडू नये, यासाठी महसूल विभागाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्या उपाययोजना तोकड्या ठरत असल्याने वाळू तस्करीला उधाण आले आहे.त्यामुळे कोंढाळाच्या सिंड्राई रेती घाटात रात्रीस चालणारे अवैध वाळू उपश्याचे खेळ तात्काळ बंद करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
- Advertisement -

