- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-एखादेवेळी प्रवास करतांना वा इतर कारणांमुळे शैक्षणिक कागदपत्रे म्हणजेच दस्तऐवज हरवल्याच्या अनेक घटना आपण बघितल्या आहेत.बहुदा काहीजण शैक्षणिक कागदपत्रे हरवल्यास दुर्लक्ष करून ‘जाऊ द्या.!’ परत पुन्हा विद्यापीठात जाऊन वा इतर कार्यालयांतून कागदपत्रे काढून घेऊ,असे करीत असतात.मात्र,असे करणे म्हणजे फसवणूक करणाऱ्यांना आमंत्रण देणे ठरू शकते व तश्याच प्रकारचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिंपरी तालुक्यातील एका तरुणाच्या बाबतीत नुकताच उघडकीस आला आहे.तरुणाचे काही वर्षांपूर्वी शैक्षणिक कागदपत्रांसह पॅन कार्ड,आधारकार्ड व ओळखपत्रही हरवले होते.त्यानुसार तरुणाने पोलिसांत तक्रारही दाखल केली.पण,सगळे सुरळीत सुरू असतांनाच धाडकन मार्च २०२५ व हल्ली सुरू असलेल्या जून २०२५ मध्ये अचानकपणे आयकर विभागाची थकीत रक्कम म्हणून चक्क १५ कोटी ४८ लाख रुपये भरणा करण्याची नोटीस बजावण्यात आल्याने तरुणाने डोळेच वटारले व आलेल्या नोटीसाकडे डोळे फाडून बघू लागला.हा सर्व प्रकार घडलेल्या तरुणाचे नाव दिवाकर कुकुडकर वय ३७ वर्षे असे असून तो चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा गावातील रहिवासी आहे.विशेष बाब म्हणजे,दिवाकरला वर्ष २०२२-२३ मध्ये जीएसटीची नोटीस मिळाली होती.पण,त्यावेळी जीएसटी विभागाने पडताळणी करून यात तरुणाचा सहभाग नसल्याचे स्पष्ट केले होते.त्यानुसार जीएसटी विभागाकडून फेक जीएसटी म्हणून त्यावेळी नोंद करण्यात आली होती.मात्र,आयकर विभागाची कोट्यवधी रुपयांची नोटीस मिळताच दिवाकरने आयकर विभागात जाऊन खरी आपबिती सांगितली असता पडताळणी अंती दिवाकरच्या नावावर शिवाजी ट्रेडिंग नावाची कंपनी दाखवण्यात आली असून त्याच्या नावे जीएसटी नोंदणी पण करण्यात आल्याची माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली.त्यानुसार सर्वात मोठा हादरा बसलेल्या दिवाकरने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार दिली आहे.पण,दुसऱ्याने केलेली करणी दिवाकरच्या माथी पडलेली असल्याने आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी दिवाकरचा श्रम,पैसा आणि वेळ वाया जात आहे.त्यामुळे शैक्षणिक कागदपत्रे हरवल्यास दुर्लक्ष करू नका.
- Advertisement -

