उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :- व्हॉट्सॲप चॅटच्या मुद्द्यावर दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय चर्चेत आहे. भारतीय पुरावा कायदा (IEA) अंतर्गत योग्य प्रमाणपत्राशिवाय व्हॉट्सॲप चॅट्स पुरावा म्हणून स्वीकारल्या जाऊ शकत नाहीत; असे उच्च न्यायालयाने नमूद केले.डेल इंटरनॅशनल सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध आदिल फिरोज या प्रकरणात हा निर्णय देण्यात आला. प्रमाणपत्राशिवाय व्हॉट्सॲप चॅटला पुरावा मानता येणार नाही; असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.फोन हे इलेक्ट्रॉनिक उपकरण असल्याने आणि भारतीय पुरावा कायद्यानुसार,त्यातून घेतलेले साहित्य (व्हॉट्सॲप चॅट)संबंधित अधिकाऱ्याने ते उपकरणावरून घेतले असल्याचे प्रमाणित करावे लागेल.
आदिलने डेलविरुद्ध ग्राहक न्यायालयासमोर केलेल्या तक्रारीपासून या प्रकरणाची सुरुवात झाली.यानंतर डेलने राज्य आयोगाच्या आदेशाला आव्हान देणारी राज्यघटनेच्या कलम २२६ आणि २२७ अंतर्गत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
न्यायालयाने म्हटले आहे की,भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २२६ अंतर्गत रिट याचिकेवर विचार करताना,न्यायालय प्रमाणपत्राशिवाय व्हॉट्सॲप संभाषणांचे स्क्रीन शॉट्स विचारात घेऊ शकत नाही. न्यायमूर्ती प्रसाद म्हणाले की, पुरावा कायदा,१८७२ (IEA) अंतर्गत आवश्यक प्रमाणपत्राशिवाय WhatsApp संभाषणे पुरावा म्हणून वाचता येणार नाहीत.

