- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचा सातवा स्थापना दिन समारंभ काल,शनिवार २४ मे २०२५ रोजी देसाईगंज पंचायत समिती सभागृहात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रसंगी मार्गदर्शन करतांना आमदार मसराम म्हणाले की,कुष्ठांतेयांना समाजात प्रतिष्ठेने जीवन जगण्याचा अधिकार आहे.त्यांचे हक्क,अधिकार कुणीही हिरावून घेऊच शकणार नाही.कुटुंबात तसेच समाजात कुष्ठांतेयांना कसलाही छळ होणार नाही,याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.तसेच कुष्ठांतेयांना शासकीय, प्रशासकीय स्तरावरून निर्माण होणाऱ्या समस्याची सोडवणूक करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहणार.कुष्ठांतेयांना रोजगाराच्या दृष्टीने कोणत्याही समस्या असोत ते सोडविण्यासाठी सुद्धा नक्कीच प्रयत्न केला जाईल.तसेच येत्या पावसाळी अधिवेशनात कुष्ठांतेयांच्या समस्या मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी कुष्ठांतेयांना कुटुंबात तसेच समाजात भेडसावणाऱ्या कलंक व भेदभावात्मक समस्याबाबतची दृक-श्राव्य चित्रफिती सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेने तयार केलेली होती.स्थापना दिन सोहळ्याचे औचित्य साधून चित्रफितीचे विमोचन आमदार मसराम यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच गडचिरोली सरपंच संघटनेच्या अध्यक्षा अपर्णा राऊत यांच्या वतीने कुष्ठांतेयांच्या हक्कासाठी कार्य करीत असलेले कुष्ठांतेय संस्थेच्या उपाध्यक्षा विद्या कांबळे यांचा शाल,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार रामदास मसराम तर प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली सरपंच संघटनेच्या अध्यक्षा अपर्णा राऊत,पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन राऊत,प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक गहाणे,कुष्ठांतेय अधिकार मंचचे सदस्य लतिफ शेख,सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचे अध्यक्ष महादेव चौधरी,मानद कार्यकारी संचालक गुणवंत वैद्य,कुष्ठरोग तंत्रज्ञ दिनकर संदोकर,तालुका कुष्ठांतेय समितीचे अध्यक्ष महेंद्र खरकाटे यांची उपस्थिती होती.यावेळी प्रमुख अतिथीचे समयोचीत मार्गदर्शन झाले.कार्यक्रमास आरमोरी,कुरखेडा,देसाईगंज तालुक्यातील ८० कुष्ठांतेय बंधूची उपस्थिती होती.तसेच अलर्ट इंडिया मुंबईचे कर्मचारी व सक्षम कुष्ठांतेय स्वाभीमानी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नारायण उरकुडे,श्रावण हांडेकर या कुष्ठांतेयांनी त्यांना आलेल्या समस्या,आवाहने याविषयी आपली जीवनगाथा प्रस्तुत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद बारसिंगे यांनी केले तर सूत्रसंचालन शरद निकुरे यांनी केले.कुष्ठांतेयांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी दिले तसेच संस्थेला आर्थिक सहकार्य केल्याने विद्या कांबळे यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या व अलर्ट इंडियाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
- Advertisement -

