उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-बेकायदा वृक्षतोडीच्या दंडाची रक्कम एक हजार रुपयांवरून ५० हजार करण्यात येईल.यासाठी पुढील आठवड्यात वटहुकूम जारी करण्यात येणार असल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल,शुक्रवारी विधानसभेत केली.
जिंतूरजवळील महामार्गासाठी ४०० वर्षे जुनी वडाची मोठी झाडे तोडल्याचा तारांकित प्रश्न आ.राहुल पाटील यांनी उपस्थित केला होता.यावेळी चर्चेला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले,बेकायदा वृक्षतोडीसंदर्भात १९६७ च्या कायद्यानुसार एक हजार रुपयांचा दंड आकारला जातो.त्यात नंतरच्या काळात वाढ केलेली नाही. १९६७ च्या हजार रुपयांचे आजचे मूल्य ५० पट वाढले असल्याने यापुढे बेकायदा वृक्षतोडीला पन्नास हजार रुपये दंड आकारला जाईल.यासंदर्भात सोमवारपर्यंत लेखी आदेश जाहीर केला जाईल. महाराष्ट्रात राज्य सरकारने पुढाकार घेऊन राबवलेल्या वनीकरण मोहिमेला चांगले यश आले आहे. महाराष्ट्रातील वनेतर वृक्षाच्छादित क्षेत्रात किंवा वनेतर हरित क्षेत्रात अडीच हजार चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे; असेही मुनगंटीवार यांनी प्रश्नावरील उत्तरात सांगितले.
खासगी जमिनीतील वृक्षतोडीसंदर्भात एखाद्याने विहित नमुन्यात परवानगी मागितल्यास त्यासंदर्भात विहित कालावधीत निर्णय देणे बंधनकारक केले जाईल.वेळेत निर्णय न घेणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड ठोठावला जाईल.याबाबतचेही आदेश जारी करणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

